आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलन – दुबई

0
14

२०१३मध्ये मी वकिलाच्या ऑफिसमधील नोकरी सोडली आणि आता पुढे काय? असा विचार करत असताना मी फेसबुकवर ‘Emirates Airline Festival of Literature’ ला काही स्वयंसेवक हवे असल्याची बातमी वाचली. ही जाहिरात म्हणजे माझ्यासारख्या पुस्तकवेड्या माणसासाठी सुवर्णसंधी होती. लगेच योग्य तो फॉर्म भरून टाकला आणि २०१३ च्या मार्च महिन्यात दुबईमधील या जादुई नगरीशी माझी पहिली ओळख झाली. तिथेच मनाशी ठरवले कि याच संस्थेत आपल्याला नोकरी मिळवायची.

मी हट्टाने त्यांच्या मागे लागले नोकरी मिळण्यासाठी, अगदी फुकट काम करायची पण तयारी दाखवली. मग काय त्या जादुई नगरीचे दरवाजे माझ्यासाठी उघडले गेले. माझा प्रवेश झाला तो एक मदतनीस म्हणून. कुणालाही काही जादाचे काम द्यायचे असेल तर ते मला सांगत. मला कधीच कुठलेही काम करायची लाज नाही वाटली. मी प्रामाणिकपणे काम करत गेले आणि मग माझी नोकरी तिथे पक्की झाली.

नोकरी पक्की झाल्यानंतर हे संमेलन कसे चालते? त्याची पडद्यामागची तयारी कशी असते? हे जवळून बघयाला मिळाले. आज तुम्हालासुद्धा त्याबद्दल थोडे सांगणार आहे.

हे संमेलन १० दिवस चालते. आधी ५ दिवस चालायचे पण आता लोकांच्या सोयीसाठी कालावधी वाढवला आहे. या संमेलनासाठी जगभरातून साधारण १३० पेक्षा जास्त लेखक येतात. त्यांचे २००च्या आसपास सत्र होतात. काही परिसंवाद, कार्यशाळासुद्धा असतात. या संमेलनाला साधारण ५०,००० लोक भेट देतात आणि २८,००० विद्यार्थी सहभागी होतात. विद्यार्थ्यांसाठी काही स्पर्धा होतात. त्यांच्यातील लेखक आणि कवीला प्रोत्साहन दिले जाते. हा सगळा डोलारा सांभाळायला आणि यशस्वीपणे पार पडायला साधारण १५ ते २० लोक वर्षभर काम करतात आणि संमेलनाच्या काळात किमान ६०० स्वयंसेवक मदतीला येतात.

Emirates Airline Festival of Literature (EAFOL) हि संस्था Emirates Literature Foundation चा एक भाग आहे. EAFOL मध्ये कम्युनिकेशन, ऑपरेशन, प्रोग्रामिंग आणि शैक्षणिक असे चार महत्वाचे विभाग येतात. या विभागांबद्दल आणि त्यांच्या कामाबद्दल थोडे जाणून घेवू.

सगळ्यात प्रथम बघू प्रोग्रामिंग विभाग. या विभागाचे काम असते देश विदेशातील लेखकांना संपर्क करायचे, त्यांना या संमेलनाबद्दल सांगायचे आणि त्यांना या संमेलनाला बोलावयाचे. काही मोठ्या लेखकांची तर तारीख १ वर्ष आधी पासून घ्यावी लागते. एकदा सगळे लेखक नक्की झाले कि त्यांची विमानाची तिकिटे काढणे, रहायची सोय करणे हे एक काम तर त्यांच्या इथल्या कार्यक्रमाची रूपरेषा ठरवणे हे दुसरे काम. इथे आल्यावर लेखक नुसते त्यांचे सत्र नाही करत तर त्यांना इथे ‘दुबई-दर्शन’ सुद्धा करवले जाते. आणि हो हे सगळे लेखक या संमेलनाला येण्यासाठी काहीही मानधन घेत नाहीत. लेखक इथे आल्यावर संमेलनाच्या काळात लेखकांच्या भेटी-गाठींसाठी एक वेगळा कक्ष असतो. त्याला आम्ही ग्रीन-रूम म्हणतो. ती सुद्धा जबाबदारी या विभागाची असते. या ग्रीन-रूममध्ये लेखकांना एकमेकांशी बोलता येते, नवीन ओळखी वाढवता येतात तसेच त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे इथे मिळतात.

दुसरा विभाग आहे शैक्षणिक विभाग. या विभागाचे काम असते वेगवेगळ्या शाळांना संपर्क करणे. त्यांना या संमेलनाची आणि विद्यार्थ्यांसाठी असलेल्या स्पर्धांची माहिती देणे. हा विभाग संपूर्ण देशातील शाळांना संपर्क करतो. विद्यार्थ्यांच्या विविध वयोगटासाठी लघुकथा आणि कवितांची एक स्पर्धा असते. प्रत्येक गटातून ३ स्पर्धक विजयी होतात. विजेत्यांचे साहित्य पुस्तकात छापले जाते. दुसरी स्पर्धा होते ती वाचकांसाठी. विद्यार्थ्यांना त्यांच्या वयोगटानुसार वाचनासाठी चांगल्या लेखकांचे एक पुस्तक सुचवले जाते आणि त्यावर प्रश्न विचारले जातात. या विभागाकडे अजून एक महत्वाची जबाबदारी असते ते म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना लेखकाच्या भेटीचा लाभ घडवून आणणे आणि म्हणून शाळांना संमेलनात घेवून येणे किंवा लेखकांना शाळेत घेवून जाणे ही एक जबाबदारी असते.

तिसरा विभाग आहे कम्युनिकेशन. या विभागाचे काम खूप महत्वाचे आहे. लोकांना या संमेलनाबद्दल सांगणे, जाहिरात करणे, पत्रकार आणि सगळ्या प्रकाराच्या मिडियामधील लोकांना लेखकांच्या मुलाखतीच्या वेळा देणे त्याप्रमाणे वेळापत्रक बनवणे. फोटोग्राफर आणि व्हिडीओग्राफर यांना कुठले सत्र किती वाजता आहे याचे वेळापत्रक देऊन त्याप्रमाणे सर्व फोटो घेणे हे ही एक महत्वाचे काम असते. त्याचबरोबर सर्व सत्रांची तिकीट विक्री करण्यासाठी लागणारे सोफ्ट्वेअर अद्ययावत ठेवण्याची जबाबदारीसुद्धा याच विभागाची.

सगळ्यात शेवटचा विभाग म्हणजे ऑपरेशन. या विभागाकडे संपूर्ण संमेलन सुरळीत पार पडायची जबाबदारी असते. बस! या एका वाक्यात या विभागाची जबाबदारी संपते पण खरं तर हा विभाग म्हणजे पाया आहे या संमेलनाचा. काहीही कमी जास्त झाले तर जबाबदारी या विभागाची असते. काही चुकले तरी लोकांना कळू न देता ती चूक सुधारणे हे या विभागाचे कौशल्य आहे. मी ५ वर्षे याच विभागात काम केले. कधी कधी तर एखाद्या मोठ्या लेखकाच्या सत्रासाठी एकावेळी ४००-४५० लोक येतात आणि नंतर त्या लेखकाची पुस्तकावर सही घेण्यासाठी रांगेत २-३ तास उभे राहतात अश्या वेळी कुठेही गडबड गोंधळ न होता हे सर्व पार पडणे मोठ्या जबाबदारीचे काम असते. या सर्वांबरोबरच ६०० स्वयंसेवकांची नोंदणी करणे, त्यांना जबाबदाऱ्या वाटून देणे, आणि प्रत्येक ठिकाणी स्वयंसेवक असतील याची व्यवस्था बघणे हे यांचे काम असते. या विभागात काम करायचे म्हणजे डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवावी लागते. कितीही ताण तणाव असला तरी चेहऱ्यावर एक हास्य असणे अत्यंत गरजेचे असते. अर्थात यामुळे निम्मा ताण कमी होतो.

EAFOL ची संपूर्ण टीम वर्षभर याच १० दिवसांसाठी काम करत असते आणि म्हणूनच सलग तीन वर्षे या संमेलनाला ‘Best Festival of the Middle East’चे पारितोषिक मिळाले आहे. या दहा दिवसात सर्व टीम अव्याहतपणे अगदी न झोपता म्हटले तरी चालेल काम करते. ‘जिथे कमी तिथे आम्ही’ हे ऑपरेशन टीमचा ब्रीदवाक्य असते.

या टीम बरोबर काम करताना मला खूप काही शिकायला मिळाले. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दिलेला शब्द पाळणे, कामामधील व्यावसायिकता (Professionalism), कुठेही आप-पर भाव नाही आणि वाशिलेबाजी नाही. सर्वाना एकत्र घेवून काम करणे आणि अत्यंत बारीकीने नियोजन करणे. टीममधील प्रत्येक जण एक एक पैसा जपून खर्च करतो. या संमेलनासाठी अनेक प्रायोजक आहेत ज्यांच्या सहकार्यामुळे हे सर्व सहज शक्य होते. ‘मला काय करायचे आहे, हे माझे काम नाही’ अशी वृत्ती इथे काम करताना ठेवून चालत नाही. तुम्हाला काही त्रुटी दिसली तर लगेच ती सुधारायला योग्य त्या माणसाला संपर्क करणे अथवा स्वतः सुधारणे असे दोनच पर्याय तुमच्यासमोर असतात.

आपल्याला यातून खूप काही शिकण्यासारखे आहे. आपल्याकडे सुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर अशी माझ्या माहितीत २ संमेलने होतात, एक मुंबईला होते – Mumbai LitFest आणि दुसरे म्हणजे Jaipur LitFest. जयपूरला होणारे संमेलन तर आशियामधील पाचव्या क्रंमाकाचे मोठे संमेलन आहे.

जे दुबईत असतील त्यांना यासाठी स्वयंसेवक म्हणून काम करता येते. अधिक माहितीसाठी www.emirateslitfest.com या वेबसाईट ला भेट द्या.

 

JOIN OUR MAGAZINE
I agree to have my personal information transfered to MailChimp ( more information )
Join over 3.000 visitors who are receiving our magazine and weekly news to stay updated in news
We hate spam. Your email address will not be sold or shared with anyone else.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.